Friday, September 28, 2012

हिंदू कुत्रा


महाराष्ट्रातील एक पत्रकार सध्या पाकिस्तान मधील हिंदूंच्या मानवी हक्कांवर अभ्यास करीत आहेत. त्यानिम्मित ते जोधपूरला गेले होते. त्यांची-माझी आज भेट झाली. जोधपूरचे कैक अनुभव त्यांच्याकडून ऐकायला मिळाले. त्यांच्याकडूनच ही सत्यकथा ऐकली. आणि मन हेलावून गेले. म्हणून ती व्यथा आपणा सर्वांपर्यंत पोहोचवत आहे.
सिंध प्रांतातील कुठल्याशा गावातील ही घटना. त्या गावात मोठ्या प्रमाणात हिंदू वस्ती आहे. एके दिवशी एक पिसाळलेला कुत्रा एका मुलाला चावला आणि त्यामुळे तो मुलगा दगावला. तो मुलगा मुसलमान होता. त्याच्या आई-वडिलांनी आणि इतर लोकांनी त्यावर गदारोळ सुरु केला. पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल झाली की कुत्रा हिंदूंचा असल्यामुळे ह्यामध्ये हिंदू लोकांचा हात आहे. तक्रारीवर जलदगतीने हालचाल करत पोलिसांनी हिंदू वस्तीवर छापा टाकला. आणि ४ लोकांना अटक केली. त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला की त्यांच्या कुत्र्याने चावा घेऊन एका मुलाचा खून केला! केस कोर्टात गेली. ४ पैकी एक जण पाहुणा होता, म्हणून तो सुटला. बाकी तिघे मात्र अडकले. न्यायाधीशांनी केसचा निकाल दिला, 'पिसाळलेला कुत्रा हा हिंदू माणसाचा आहे, आणि त्यामुळे हिंदू त्यात दोषी आहेत'. शिक्षा म्हणून त्या तीनही हिंदूंना जन्म-ठेपेची शिक्षा झाली. ते तिघेही जण आजही सिंध प्रांतातल्या हैदराबाद केंद्रीय कारागृहात आपली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.
ऐकून मन सुन्न झाले, डोके गरगरले! चीड आली, संताप आला. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांक आहेत. त्यांच्यावर तिथे अनन्वित अत्याचार होत आहेत. दिवसागणिक कित्तीतरी आया-बहिणींवर बलात्कार होत आहे, त्यांचे धर्मांतर होत आहे. कित्येक हिंदू सीमा ओलांडून भारतात येत आहेत. त्यांच्या अत्याचाराच्या बातम्या आपण सतत वाचत/ ऐकत असतो. पण ही प्रत्यक्ष घटना ऐकून मात्र काहीच सुचेना.
मनात सतत एकच प्रश्न डोकावत आहे- इतक्या वर्षांपासून अत्याचार होत असूनही हे लोक हिंदू राहिलेच कसे?